आरोपी एसीपीचे न्यायालयातून पलायन
By admin | Published: March 25, 2017 02:48 AM2017-03-25T02:48:50+5:302017-03-25T02:48:50+5:30
सावत्र मुलाच्या हत्येच्या गुन्ह्यांत कैद असलेला एसीपी शिवाजी नरावणे गुरुवारी सत्र न्यायालयातून पसार
मुंबई : सावत्र मुलाच्या हत्येच्या गुन्ह्यांत कैद असलेला एसीपी शिवाजी नरावणे गुरुवारी सत्र न्यायालयातून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकनगर येथील इमारत क्रमांक १५८/४ मध्ये रोहन झोडगे (२५) हा आई नंदा, लहान भाऊ आणि बहिणीसह राहात होता. नंदाने रोहनच्या वडिलांना म्हणजे पहिल्या पतीला २००९ मध्ये सोडले होते. तिने शिवाजी नरवणे यांच्याशी विवाह केला होता. त्याला रोहनचा विरोध होता. त्यावरून तो आईला सारखा त्रास द्यायचा. चेंबूरमधील दोन घरांपैकी एक आपल्या नावावर करावे असा तगादाही त्याने लावला होता. नंदा आणि नरावणेने आॅक्टोंबर २०१३ मध्ये रोहनची हत्या केली. २०१३ मध्ये नरावणे सुरक्षा व संरक्षण विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त होता. शिवाजी नरवणे १९८३ मध्ये मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रूजू झाले.
मुंबई व ठाण्यात त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. टिळकनगर येथेही त्यांनी काम केले होते.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याला कुलाबा येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातून बाहेर येताच त्याने पोस्टात काम असल्याचा बहाणा केल. त्याच दरम्यान न्यायालयाबाहेर असलेल्या गर्दीचा फायदा घेत नरावणेने पळ काढला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)