पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार
By Admin | Published: April 12, 2017 01:27 AM2017-04-12T01:27:43+5:302017-04-12T01:27:43+5:30
येथील न्यायालयातून येरवडा कारागृहात आणण्यात येत असलेले तीन सराईत गुन्हेगार लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. कात्रज जुन्या घाटामध्ये ही घटना घडली.
पुणे : खंडाळा (जि. सातारा) येथील न्यायालयातून येरवडा कारागृहात आणण्यात येत असलेले तीन सराईत गुन्हेगार लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. कात्रज जुन्या घाटामध्ये ही घटना घडली.
गुन्हेगार पसार झाल्याप्रकरणी पोलीस हवालदार संजय चंदनशिवे यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काल्या उर्फ राजू महादेव पात्रे (रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मच्छिंद्र जगताप (रा. मोरवाडी तुपेनगर, पिंपरी) आणि लुभ्या उर्फ संतोष चिंतामण चांदीलकर (रा. लवळे ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील न्यायालयामध्ये दरोड्याच्या खून्यात तीन आरोपींची सुनावणी होती, कोर्टाची पुढची तारीख मिळाल्यानंतर आरोपींना सरकारी गाडीने पुन्हा येरवडा कारागृहात नेले जात होते. मात्र, त्यांना बेड्या अडकविण्यात आल्या नव्हत्या. गाडी जुन्या कात्रज घाटामार्गे आणली जात असताना, तिघांना लघुशंका लागली असल्याने चेकपोस्टजवळील एका वळणावर गाडी थांबविण्यात आली. आरोपी आणि पोलीस गाडीतून खाली उतरले. लघवी करीत असताना आरोपींच्या पाठीमागेच पोलीस उभे होते. पोलिसांना धक्का देऊन आरोपी जंगलाच्या दिशेने अंधारात पळून गेले. पोलीस त्यांच्या पाठीमागे पळाले, पण आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. (प्रतिनिधी)
चार पोलीस निलंबित
सराईत गुन्हेगार पसार झाल्याप्रकरणी पोलीस हवालदार संजय चंदनशिवे, एस. व्ही कोकरे, एस. के खाडे आणि व्हि.ए मांढरे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याचे डीसीपी अरविंद छावरिया यांनी सांगितले.