बारबाला हत्याप्रकरणी दीड वर्षाने आरोपी सापडला
By admin | Published: November 30, 2015 03:11 AM2015-11-30T03:11:51+5:302015-11-30T03:11:51+5:30
सोनी रॉय या बारबालेच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी आणि तिचा पती दिलीप याला तब्बल दीड वर्षाने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे
कल्याण : सोनी रॉय या बारबालेच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी आणि तिचा पती दिलीप याला तब्बल दीड वर्षाने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून जेरबंद केले आहे. कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला सुपूर्द करण्यात आले आहे.
पश्चिमेकडील एका बारमध्ये एकत्र काम करणारे सोनी आणि दिलीप हे पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील गणेश कॉलनीत वास्तव्याला होते. ४ मे २०१४ या दिवशी सकाळी तिची बहीण रीतू घरी आली असता तिला सोनीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रीतूकडे चौकशी केली असता दिलीप हा सोनीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांची वारंवार भांडणे व्हायची, अशी माहिती समोर आली होती. या घटनेनंतर दिलीप फरार झाल्याने त्यानेच ही हत्या केली, असा अंदाज पोलिसांनी बांधला होता. रीतूच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. स्थानिक कोळसेवाडी पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. यात गुन्हे अन्वेषण विभागाला दीड वर्षानंतर यश आले असून आरोपी दिलीपला अटक करून कोळसेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि चिवड शेट्टी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी) सोनी ही शशी नामक व्यक्तीबरोबर राहात होती. ते दोघेही दिलीप राहत असलेल्या घराजवळच वास्तव्यास होते. ‘तुला दुसऱ्यासोबत राहायचे असेल तर माझ्यापासून दूर जा’, असे अनेकदा दिलीपने सोनीला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याचे ऐकले नाही. यातून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. १ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त बार बंद असल्याने सोनी ही घरी होती. शशी नसल्याचा फायदा घेऊन दिलीप घरात घुसला. यावेळी झालेल्या वादात त्याने सोनीचा गळा आवळून तिची हत्या केली.