बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:23 PM2024-09-23T20:23:56+5:302024-09-23T20:27:47+5:30
याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
मुंबई : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली. त्याला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलिसाची बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या.
यावेळी पोलीस आणि अक्षय यांच्यात झडापट झाल्यानंतर अक्षयवर पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचेही सांगण्यात येत आहे. अक्षयचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. तर या बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे. तसेच, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती मिळाली नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
याचबरोबर, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
दरम्यान, शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते.