आरोपी आमदार रमेश कदम यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी
By admin | Published: August 13, 2016 10:07 PM2016-08-13T22:07:26+5:302016-08-13T22:07:26+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
Next
>- ऑनलाइन लोकमत
अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण
बुलडाणा, दि. 13 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना १३ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे चौकशीसाठी आणण्यात आले. सदर घोटाळ्याचे तार बुलडाण्यापर्यंत पोहोचलेले असल्याने पुणे सीआयडी पथक तपासकामासाठी कदम यांना घेवून बुलडाण्यात दाखल झालेले आहे. बुलडाणा न्यायालयाने कदम यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मोहोळ येथील आमदार रमेश कदम हे ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळातील कोट्यावधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे सप्टेंबर २०१५ मध्ये महासंचालनालयाने काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांना इतर सदस्यांच्या मदतीने ३०० कोटींचा घोटाळा केल्याने निष्पन्न झाले आहे.
महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली. आमदार रमेश कदम या घोटाळ्यात मुख्य आरोपी झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी पक्षाने तडकाफडकी निलंबित केले होते. विशेष म्हणजे मागील वर्षी १७ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ते पोलिसांच्याच ताब्यात आहेत. या घोटाळ्याचे तार बुलडाण्यापर्यंत पोहोचलेले असून अनेकांना सुध्दा चेकद्वारे कर्जाचे मंजुरी आदेश काढलेले असल्याचे प्रकरण दाखल आहे. आ.कदम यांची या प्रकरणात किती संलीप्तता आहे किंवा तेच याही ठिकाणी झालेल्या घोटाळ्याचे सुत्रधार आहेत का, याची सखोल चौकशी केल्याशिवाय यातील तथ्य बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत आहे. यासाठी प्रकरणाचे तपास करणारे सीआयडी अधिकारी अतुल लांबे बुलडाण्यात दाखल झाले आहेत.