खून प्रकरणातील आरोपींचे पोलीस कोठडीतून पलायन
By Admin | Published: April 9, 2017 01:21 PM2017-04-09T13:21:04+5:302017-04-09T13:21:04+5:30
टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगीराज शिवराज खंडागळे याचा 12 दिवसांपूर्वी खून झाला.
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 9 - टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगीराज शिवराज खंडागळे याचा 12 दिवसांपूर्वी खून झाला. या प्रकरणातील सात आरोपींना 3 एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. उद्या कोठडीची मुदत संपणार होती, मात्र 9 एप्रिलला पहाटे दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवून, तारेची जाळी उचकटून कोठडीतून पलायन केले.
खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय 40, रा. खडकी), सनी विजय अॅन्डी (वय 25, धानोरी विश्रांतवाडी) या दोन आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी या दोन आरोपींसह सनी ज्ञानेश्वर तायडे, योगेश ऊर्फ बालसुब्रह्मण्यम पिल्ले, रॉकी ऊर्फ डम्पी फ्रान्सिस मोती, आकाश दत्ता चांदणे, प्रकाश लिंग्या राठोड, आरिफ रियाज घोडेस्वार यांना 3 एप्रिलला पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यांच्याबरोबरच्या 6 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींपैकी दोन जण पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले.
खडकी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी बाजीराव चिमन ठोंबरे यांनी या घटनेची फिर्याद नोंदवली आहे. आरोपी पळून गेल्याने संबंधित पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.