Pune: पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला करणारे 'ते' आरोपी सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:32 PM2024-08-26T14:32:52+5:302024-08-26T14:36:07+5:30
Pune Crime News: कोयता गँगमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्यावरच वार करण्यात आले. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात हा अधिकारी थोडक्यात वाचला.
Pune Crime: कर्तव्यावर असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. रविवारी (25 ऑगस्ट) ही घटना घडली. आरोपींनी थेट डोक्यातच वार केल्याने अधिकारी गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणेपोलिसांना यश आले आहे. हे आरोपी कोण आहेत आणि त्यांना कोणत्या शहरात अटक करण्यात आली, याबद्दलची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुण्यातील हडपसर भागात सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची ही घटना घडली.
झाले असे की, दुचाकींचा अपघात झाला आणि त्यानंतर दोन गटात वाद सुरू झाला. यावेळी पोलीस अधिकारी गायकवाड गाडीवरून जात होते. वाद सुरू असल्याचे बघून ते थांबले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
भांडण सोडवत असताना त्यांनी आरोपीच्या हातातील कोयता घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी निहालसिंग टाक याने पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांना कोयता फेकून मारला. डोक्यात वार झाल्याने ते जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसावर हल्ला करणारे आरोपी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, निहालसिंग मन्नूसिंग टाक (रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग ऊर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलिसांनी सोलापुरात ठोकल्या बेड्या
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपी सोलापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.