आरोपीला आठ वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: August 16, 2016 12:44 AM2016-08-16T00:44:30+5:302016-08-16T00:44:30+5:30
प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नागपूर : प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पप्पू ऊर्फ देवमन रामभाऊ बोराटे (३५) असे आरोपीचे नाव असून २६ मे २०१४ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने त्याला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई व न्या. विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपीला कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-भाग २ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आठ वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली. दंड व अन्य शिक्षा कायम ठेवली.(प्रतिनिधी)