आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करावेत
By Admin | Published: March 1, 2017 01:16 AM2017-03-01T01:16:24+5:302017-03-01T01:16:24+5:30
निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत.
पुणे : निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत. आरोप करणारांनी ते सिद्ध करावेत. येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदानाची अंतिम आकडेवारी टाकली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
मतदान यंत्रावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना कुणाल कुमार यांनी सर्व आरोप खोडून काढले व प्रशासनाचे कामकाज पारदर्शीच असल्याचा दावा केला. मतमोजणीनंतर लगेचच जाहीर करण्यात आलेली आकडेवारी अंतिम नव्हती. महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकलेली आकडेवारीही फक्त माहितीकरता म्हणून जाहीर करण्यात आली होती. आयोगाच्या संकेतस्थळावर येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल, असे कुणाल कुमार म्हणाले.
आरोपाविषयी बोलताना त्यांनी पराभूतांकडूनच तक्रारी केल्या जात आहेत, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मतदानाच्या आधी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मॉक पोल म्हणजे मतदानाची रंगीत तालीम घेतली जाते. त्यावेळी, नंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडताना, मतदान यंत्रे सील केली जाताना, ती स्ट्रॉँग रूममध्ये एक दिवस बंदिस्त असताना कोणीही तक्रार केली नाही. मतमोजणी सुरू असतानाही कोणाची तक्रार नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र आता तक्रार व आरोप केले जात आहेत, शंका व्यक्त होत आहेत. त्यात काही तथ्य नाही.
मतदानातील तफावतीबाबत कुणाल कुमार म्हणाले, काही निर्णय अधिकाऱ्यांनी टपाली मतदान एकूण मतदानात जमेस धरले तर काहींनी नाही. त्यामुळे बेरजेत फरक दिसतो आहे. अंतिम आकडेवारीत तो दुरूस्त होईल. त्यामळे एकाही प्रभागाच्या निकालात काही फरक पडणार नाही, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. मतमोजणीनंतर दोन दिवस सुटी होती. अधिकारी, कर्मचारी सलग दोन दिवसांच्या कामाने थकले होते, त्यामुळे आता सर्व बेरजा करून अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल.
>तक्रारी नाहीत
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी येथील तक्रारीशिवाय एकही तक्रार आलेली नाही. तेथील तक्रारीची तपासणी सुरू आहे. मतदान यंत्रातील सर्व मते तसेच पोस्ट मतेही सुरक्षित आहेत. एक वर्षापर्यंत हा दस्तऐवज जपून ठेवण्यात येतो. निकाल लागल्यापासून १० दिवसांच्या आत न्यायालयीन तक्रार करावी लागते. तशी तक्रार झाली तरी प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शीपणा असल्यामुळे सर्व माहिती लगेच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.