आरोपीने घेतली मिठी नदीत उडी
By admin | Published: July 22, 2016 03:54 AM2016-07-22T03:54:12+5:302016-07-22T03:54:12+5:30
एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने न्यायालयाच्या आवारातून पळ काढत मिठी नदीमध्ये उडी घेतल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली.
मुंबई : एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने न्यायालयाच्या आवारातून पळ काढत मिठी नदीमध्ये उडी घेतल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. नदीला पाणी असल्याने आरोपीला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागली. अखेर आरोपीच बाहेर आल्याने पोलिसांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला.
मोहम्मद साजिद अली शेख (२४) असे या आरोपीचे नाव असून, तो कुर्ला पश्चिम येथे राहतो. दोन दिवसांपूर्वी चेंबूर पोलिसांनी या आरोपीला एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. बुधवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर एका शिपायासोबत तो त्या ठिकाणी उभा असताना शिपायाचे लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने न्यायालयाच्या परिसरातून पोबारा केला. हे पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ आरोपीचा पाठलाग केला. मात्र तोपर्यंत आरोपीने मिठी नदीत उडी घेतली होती. मिठी नदीला पाणी असल्याने आरोपीला तिथून बाहेरदेखील निघता येत नव्हते. मात्र पोलीस पुन्हा पकडतील, या भीतीने तो पाण्यात थांबला होता. अखेर कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस लांबलचक दोरी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १ तास या आरोपीला बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी दोरी फेकली. मात्र आरोपी बाहेर येण्यास तयार नव्हता. मात्र नंतर स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने दोरीचा आधार घेतला.
हे नाटक पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. (प्रतिनिधी)