आदिवासी विकास विभागात ‘आचारी’ प्रशिक्षण घोटाळा
By admin | Published: April 25, 2017 02:20 AM2017-04-25T02:20:59+5:302017-04-25T02:20:59+5:30
राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ््यापाठोपाठ आता ‘आचारी’ प्रशिक्षणातही लाखोंचा घोटाळा झाल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
गणेश वासनिक / अमरावती
राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ््यापाठोपाठ आता ‘आचारी’ प्रशिक्षणातही लाखोंचा घोटाळा झाल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. कागदोपत्री राबविल्या गेलेल्या या घोटाळ्याच्या साखळीत कुणी हात ओले केले? हे तपासाअंती लवकरच स्पष्ट होईल.
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत राज्यात आदिवासी समाजातील युवक, युवती, महिला तसेच वैयक्तिक शिक्षित, अशिक्षितांना २०१३-२०१४ या वर्षांत आचारी प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी विकास विभागाने या प्रशिक्षणाची जबाबदारी अमरावती येथील यशवंत मानव विकास प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्थेकडे सोपविली होती. थेट आदिवासी विभागाचे आदेश असल्याने ही संपूर्ण कार्यवाही प्रकल्प अधिकारी स्तरावरून पार पडली. विभागाच्या अमरावती, नागपूर, नाशिक व ठाणे या चार अपर आयुक्तांकडे या प्रशिक्षणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती.
प्रशिक्षणाच्या नावे प्रति प्रशिक्षणार्थी ४७ हजार २०५ रुपये देयक काढण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून किती आदिवासी महिला, युवक आणि युवतींना लाभ मिळाला, याची शहानिशा करण्याची एकाही अधिकाऱ्याने तसदी घेतली नाही. आदिवासी विकास विभागात बहुतांश योजना कागदावरच राबविल्याचे दिसून येते.