आचार्यदेव श्री देवेंद्रसागर महाराज यांचे १२ वर्षांनी कोल्हापुरात आगमन
By Admin | Published: May 16, 2017 01:29 AM2017-05-16T01:29:18+5:302017-05-16T01:29:18+5:30
‘मूर्तिपूजक’चा वर्धापनदिन उद्या; बेळगावात २५ जूनला चातुर्मास प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : परमपूज्य आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज यांचे १२ वर्षांनंतर कोल्हापुरात आगमन झाले आहे. ‘आचार्यपद’ ही पदवी मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थित्तीत शाहूपुरीतील शांतीनाथ भगवान जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचा वर्धापनदिन, प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संघाचे प्रवीणभाई मणियार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष मणियार म्हणाले, मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज यांनी वयाच्या १५ व्या वर्षी पद्मसागर महाराज यांच्यासमवेत भ्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना एका वर्षाने आचार्यदेव श्री कैलाससागर सुरिश्वरजी यांनी दीक्षा व्रत दिले. पुढे धार्मिक ज्ञानाच्या जोरावर आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज यांना श्री शत्रुंजय तीर्थ पलिताना (गुजरात) येथे पंन्यासपद आणि दि. १ डिसेंबर २०१४ मध्ये नाकोडा तीर्थ (राजस्थान) येथे ‘आचार्यपद’ ही पदवी बहाल केली. बारा वर्षांपूर्वी त्यांचा कोल्हापुरात चातुर्मास झाला होता. त्यानंतर ‘आचार्यपद’ मिळाल्यानंतर त्यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन झाले आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तिपूजक संघाचा ५९ वा वर्धापनदिन बुधवारी (दि. १७) होणार आहे. यादिवशी सकाळी साडेदहा वाजता ध्वजपूजन आणि दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद होईल. त्यानंतर दि. १९ ते २५ मे दरम्यान गुजरीतील संभवनाथ जैन मंदिरात सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत प्रवचन होईल. आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज म्हणाले, दीक्षा घेतल्यानंतर ४१ वर्षांत देशातील विविध भागांत दीड लाख कि.मी.चा पायी प्रवास मी केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये अहमदाबाद येथून चालत निघालो. दोन हजार कि.मी.चा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात पोहोचलो. दि. २५ जूनला माझ्या चातुर्मास प्रवेशाचा कार्यक्रम बेळगावमधील चंद्रप्रभू जैन मंदिरात होणार आहे. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाळा, ‘केएलई’चे अध्यक्ष प्रभाकर कोरे, अमित कोरे प्रमुख उपस्थित असतील. पत्रकार परिषदेस विजयभाई शहा, दीपक मणियार, तेजस शहा, देवेन शहा, राजेंद्र शहा, आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकरांमध्ये चांगली भावना
कोल्हापूरचा विकास होत आहे. येथील लोकांची भावना चांगली आहे. कोल्हापूरच्या उत्कर्षासाठी पक्ष-विपक्ष बाजूला ठेवून प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज यांनी सांगितले. ते म्हणाले, विकासासाठी कोल्हापूरला प्राधान्य देणे आवश्यक आहे. लोकांनी खूप प्रेम, आपुलकीने समाज, घरात राहावे. माध्यमांनी सकारात्मकतेवर भर द्यावा.
करवीरनगरीचा सन्मान
आचार्यदेव श्री देवेंद्रसागर सुरिश्वरजी महाराज यांनी प्रवचनांतून केलेले मार्गदर्शन, मांडलेले विचार समाजासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. त्यांना मिळालेले ‘आचार्यपद’ हे करवीरनगरीचा सन्मान वाढविणारे असून, त्यांचे येथील लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेने कौतुक करणे आवश्यक आहे, असे संघाचे अध्यक्ष मणियार यांनी सांगितले.