दृष्टिहीन प्रांजलचे यूपीएससीमध्ये यश
By admin | Published: May 11, 2016 03:55 AM2016-05-11T03:55:45+5:302016-05-11T03:55:45+5:30
उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिने आपल्या दृष्टिहीनतेवर मात करीत, यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीत ती ७७३ क्रमांकावर आहे
उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिने आपल्या दृष्टिहीनतेवर मात करीत, यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीत ती ७७३ क्रमांकावर आहे. सनदी अधिकारी होऊन महाराष्ट्रात सेवा करण्याचा मनोदय प्रांजल हिने व्यक्त केला आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात पी.एचडी करीत तिने यूपीएससीत बाजी मारली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील यशवंत विद्यालयाशेजारील चाळीत राहणारी प्रांजल लहेनसिंग पाटील लहानपासूनच हुशार आहे. तिची नजर कमजोर होत गेल्यावर, सातव्या वर्षी अंधत्व आलेल्या प्रांजलने प्रत्येक परीक्षेत बाजी मारत यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात, कोणतीही शिकवणी वर्ग न लावता उत्तीर्ण होत सर्वांचाच विश्वास सार्थ ठरवला.
तिचे तिसरीपर्यंतचे शिक्षण उल्हासनगरातील आरजेएस शाळेत आणि पुढे दहावीपर्यंतचे दादरच्या कमला मेहता अंधशाळेत झाले. चांदीबाई महाविद्यालयात अकरावी-बारावी आणि मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. तेव्हा ती मुंबई विद्यापीठातून पहिली आली होती. तिने वडिलांकडे आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी परिस्थितीवर मात करीत, दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रांजलला मदत केली.
तेथे एमए, एमफिल करून ‘जागतिक आंतरराष्ट्रीय राजकीय संबध’ या विषयात पी.एचडी चा अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर, यूपीएससी परीक्षा देत यश मिळविले. ती सध्या जेएनयू विद्यापीठातच आहे. या यशात आई-वडील, पती, मित्रमंडळी, नातेवाईक, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे तिने नम्रपणे सांगितले. विद्यापीठाने दिलेल्या सुविधांबद्दलही तिने आभार मानले आहेत. प्रांजलच्या अभिनंदनासाठी तिच्या घरी आप्तेष्टांची गर्दी झाली. (प्रतिनिधी)