ध्वनिप्रदूषण प्रकरण : न्यायाधीश अभय ओक पक्षपाती असल्याचा राज्य सरकारचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 12:52 PM2017-08-24T12:52:09+5:302017-08-24T12:53:14+5:30
न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनिप्रदूषण प्रकरणात राज्य सरकारला वेळीवेळो फैलावर घेतल्याने अखेरीस तसेच शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरुन न्यायाधीश ओक पक्षपात करत असल्याचे आरोप करणारे पत्र राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांना दिले.
मुंबई, दि. 24 - न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनिप्रदूषण प्रकरणात राज्य सरकारला वेळीवेळो फैलावर घेतल्याने अखेरीस तसेच शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरुन न्यायाधीश ओक पक्षपात करत असल्याचे आरोप करणारे पत्र राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांना दिले.
आपल्या कारर्कीदीच्या 14 वर्षात आपल्यावर कुणीतरी असा आरोप करत असल्याचे न्यायाधीश ओक यांनी सुनावणीदरम्यान म्हटले. असे असले तरी हे ध्वनिप्रदूषणाच्या प्रकरणावर आपणच सुनावणी घेऊ असेही ओक यांनी सरकारला बजावले आहे. शिवाय, न्यायाधीश ओक सरकारने केलेल्या कामाची कधीच दखल घेत नसल्याचाही आरोप सरकारनं केला आहे.
शांतता क्षेत्राबाबत आदेशाचे पालन कराच, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकार राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करेपर्यंत उच्च न्यायालयाच्या २०१६च्या आदेशान्वये रुग्णालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था व धार्मिक संस्थांच्या आजूबाजूचा १०० मीटर परिसर ‘शांतता क्षेत्रा’त मोडेल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
बुधवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, २०१६चा न्यायालयाचा आदेश अंमलात आलेला नाही. त्यामुळे त्या आदेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार अर्ज करेल.
‘आम्ही तुमचे म्हणणे ग्राह्य धरू शकत नाही. राज्य सरकारने २०१६च्या आदेशात सुधारणा करण्यासाठी अर्ज केला तरी या अर्जावर निर्णय देईपर्यंत राज्य सरकारला त्या आदेशाचे पालन करावेच लागेल,’ असे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
10 ऑगस्टला ध्वनिप्रदूषण नियमांत सुधारणा करून ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार केंद्राने राज्य सरकारला दिला. मात्र त्याचा वापर राज्य सरकारने न केल्याने राज्यात सध्या एकही ‘शांतता क्षेत्र’ नाही.
सुनावणी सुरूच राहणार
ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्याची राज्य सरकारला एवढी का घाई आहे,’ असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. या प्रकरणी दाखल याचिकांवर गुरुवारीही सुनावणी सुरूच राहणार आहे.