‘अ‍ॅप’गुरूंचे असेही एकलव्य, अंगठ्याच्या जोरावर ज्ञान ग्रहण

By admin | Published: July 19, 2016 04:00 AM2016-07-19T04:00:16+5:302016-07-19T04:00:16+5:30

एकलव्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला होता.

Acquaintance of 'app' guru, Ekalavya with knowledge of thumb | ‘अ‍ॅप’गुरूंचे असेही एकलव्य, अंगठ्याच्या जोरावर ज्ञान ग्रहण

‘अ‍ॅप’गुरूंचे असेही एकलव्य, अंगठ्याच्या जोरावर ज्ञान ग्रहण

Next

पूजा दामले,

मुंबई- एकलव्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला होता. पण सध्याच्या आधुनिक काळातले एकलव्य हे अंगठा न देता ‘त्या’च अंगठ्याच्या जोरावर म्हणजे ‘एका टच’मध्ये किंवा एका क्लिकवर ज्ञानाचे ग्रहण करून घेण्यात व्यग्र आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वच जण एकलव्याप्रमाणे ज्ञानग्रहणाचा मार्ग स्वीकारत आहेत.
प्रोफेशनल लाइफपासून स्वयंपाकघर व्हाया संस्कार असे सर्व प्रकारचे ज्ञान हे सध्या एकलव्याच्या भूमिकेतून ग्रहण केले जात आहे. स्मार्ट फोनचा वापर वाढल्यापासून कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी अथवा शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. पहिली पायरी म्हणजे ‘गुगल’वर ‘सर्च’ करणे, त्यानंतर ‘युट्यूब’वर व्हिडीओ पाहणे आणि रोजच्या रोज लागणार असेल तर थेट ‘अ‍ॅप्लिकेशन’ डाऊनलोड करणे. या तीन टप्प्यांमध्ये दडलेला ज्ञानाचा खजिना लुटण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात.
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सायंकाळी आजी-आजोबा हे घरातील लहान मुलांना स्तोत्र शिकवायचे. पण, आता लहान मुलांना पुस्तकातून शिकवण्याऐवजी ‘अ‍ॅप’द्वारे शिकवले जाते. त्यात मनाचे श्लोक, हरिपाठ, भगवद्गीता, कविता, गोष्टी यांचादेखील समावेश आहे. नोकरदार महिलांना, मुलांना शिकवायला वेळ मिळत नाही. मग, या वेळी आईनंतर ‘अ‍ॅप’ हाच या मुलांचा गुरू होतो. ‘फिटनेस’साठी ‘अ‍ॅप’गुरू अथवा ‘युट्यूब’ला गुरू मानणारे अनेक जण आपल्याला भेटतात.
इंग्रजी कसे बोलावे, शब्दांचे उच्चारण कसे करावेपासून कुठे जातोय यानुसार कोणते कपडे घालावेत यासाठीही व्हिडीओचा वापर केला जातो. युट्यूबवर जाऊन समस्या टाइप केल्यावरही त्याची उत्तरे मिळतात. बिघडलेल्या वस्तू कशा दुरुस्त कराव्यात ते अगदी नवीन वस्तूंच्या खरेदी करताना काय पाहावे, याचेदेखील व्हिडीओ सहज उपलब्ध आहेत. इतकेच कशाला ‘उदरभरणा’साठीचा गुरूही आता एका बटणावर उपलब्ध आहे. पन्नाशी पार करून साठीजवळ जाणाऱ्या महिलाही नवीन डिशेस शिकण्यासाठी टीव्हीवरील ‘कुकरी शोज’चा आधार घेताना दिसतात. तर, तरुण आणि मध्यमवयीन महिला या फेसबुक, युट्यूबवरील पदार्थांच्या व्हिडीओतूनही उत्तम ‘रेसिपी’ करून घरच्यांना खूश करतात.
>सध्याच्या आधुनिक काळातल्या शिष्यांनी इंटरनेट आणि तंत्रज्ञानालाच आपला गुरू मानले आहे. त्यामुळे या पिढीतले एकलव्य हे ‘अंगठा’ न देता ‘त्या’च अंगठ्याच्या जोरावर म्हणजे ‘एका टच’मध्ये किंवा एका क्लिकवर ज्ञानाचे ग्रहण करून घेण्यात व्यग्र आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वच जण एकलव्याप्रमाणे ज्ञानग्रहणाचा मार्ग स्वीकारत आहेत.
स्वत:चे आरोग्य सांभाळण्यसाठी तसेच वय, जीवनपद्धत, सवयी अशी माहिती देणारी ‘अ‍ॅप’ही उपलब्ध झाली आहेत. आजार टाळण्यासाठी काय करावे, काय खावे, किती चालावे हे सांगणारे ‘अ‍ॅप’च सर्वांचे व्हर्च्युअल झाले आहेत. काही अवधीतच त्यांना असतील तिथे ज्ञानार्जन करून देणारे हे ‘अ‍ॅप’गुरू आता जगतमान्य होत आहेत.

Web Title: Acquaintance of 'app' guru, Ekalavya with knowledge of thumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.