चेन्नई एक्स्प्रेसमधून अडीच कोटींचे सोने ताब्यात
By Admin | Published: January 27, 2017 08:37 PM2017-01-27T20:37:43+5:302017-01-27T20:37:43+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.
गोविंद प्रेमाराम प्रजापती (वय 35, रा. अभया नगर, काळाचौकी, मुंबई), विपुल जेठमल रावल (वय 19, रा. तखतगड, जि. पाली, राजस्थान), प्रतापसिंग कालुसिंग राव (वय 27, रा. बेयणा, ता. मावली, जि. उदयपुर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी कडक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी करीत होते.
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, भिमाशंकर बमनाळीकर, मिलींद आळंदे, गणेश शिंदे, अशोक गायकवाड, अमरदीप साळुंके, कैलास जाधव हे फलाटावर गस्त घालीत होते. त्यावेळी फलाट क्रमांक एकवर चेन्नई एक्स्प्रेस लागलेली होती. गाडीच्या क्रमांक एकच्या बोगीमध्ये 17 व 18 क्रमांकाच्या सीटवर तीन जण संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
त्यांच्याबाबत संशय अधिकच बळावल्याने पोलीस पथक त्यांच्यासोबत खडकी स्थानकापर्यंत गेले. त्यांच्याजवळील बॅगेमध्ये दोन प्लास्टीक बॉक्समध्ये जड वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष बॉक्स उघडले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगड्या आणि सोन्याचे दागिने तसेच 24 कॅरेटच्या सोन्याचे पत्र्याच्या पट्ट्या मिळून आल्या. या सर्व ऐवजाचे वजन साडेआठ किलो असून 2 कोटी 49 लाख 17 हजार 588 रुपयांचा हा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल क्षिरसागर, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रजापती हा कुरीअर म्हणून काम करतो. त्याच्याकडे अशा प्रकारचा माल वाहून नेण्याचा परवाना आहे. तो हे सोने घेऊन मुंबईच्या जव्हेरी बाजारातील प्रकाश जैन या सराफाकडे देणार होता. त्याने हे सोने चेन्नईमधून नेमके कोणाकडून घेतले आहे याची माहिती दिली नाही. जप्त करण्यात आलेल्या ऐवजामध्ये 6 किलो 599 ग्रॅम सोन्याच्या पत्र्याच्या पट्ट्यांसह दिड किलो दागिन्यांचा समावेश आहे. दागिन्यांमध्ये जवळपास 140 बांगड्या, नेकलेस, राणीहार यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांना सतर्क राहून कडक तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच वाढत्या चो-या आणि दरोड्यांना पायाबंद घालण्याबरोबर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवण्यावर आम्ही भर दिला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी सकाळी कारवाई करुन अडीच कोटींचे सोने पकडण्यात आले असून सर्व पथकाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
- डॉ. प्रभाकर बुधवंत, अधीक्षक, लोहमार्ग पुणे
https://www.dailymotion.com/video/x844q06