चेन्नई एक्स्प्रेसमधून सोने ताब्यात
By Admin | Published: January 28, 2017 01:56 AM2017-01-28T01:56:06+5:302017-01-28T01:56:06+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.
गोविंद प्रेमाराम प्रजापती (वय ३५, रा. अभयानगर, काळाचौकी, मुंबई), विपुल जेठमल रावल (वय १९, रा. तखतगड, जि. पाली, राजस्थान), प्रतापसिंग कालुसिंग राव (वय २७, रा. बेयणा, ता. मावली, जि. उदयपूर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांवर घातपातविरोधी तपासणी कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी करीत होते.
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, भीमाशंकर बमनाळीकर, मिलिंद आळंदे, गणेश शिंदे, अशोक गायकवाड, अमरदीप साळुंके, कैलास जाधव हे फलाटावर गस्त घालीत होते, त्या वेळी फलाट क्रमांक एकवर चेन्नई एक्स्प्रेस उभी होती. गाडीच्या क्रमांक एकच्या बोगीमध्ये १७ व १८ क्रमांकाच्या सीटवर तीन जण संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
त्यांच्याबाबत संशय अधिकच बळावल्याने पोलीस पथक त्यांच्यासोबत खडकी स्थानकापर्यंत गेले. त्यांच्याजवळील बॅगेमध्ये दोन प्लॅस्टिक बॉक्समध्ये जड वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष बॉक्स उघडले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगड्या आणि सोन्याचे दागिने तसेच २४ कॅरेटच्या सोन्याचे पत्र्याच्या पट्ट्या मिळून आल्या.
या सर्व ऐवजाचे वजन साडेआठ किलो असून २ कोटी ४९ लाख १७ हजार ५८८ रुपयांचा हा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून, या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल क्षीरसागर, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.