दोडामार्ग येथे कोट्यवधीचे अमली पदार्थ हस्तगत; दोघे ताब्यात
By Admin | Published: December 22, 2015 10:39 PM2015-12-22T22:39:45+5:302015-12-22T22:39:45+5:30
पण पथकाने शिताफीने आरोपींना अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथाकाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केली
दोडामार्ग : गोवा व मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री दोडामार्ग येथे छापा टाकून बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचे समजते.ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोडामार्ग येथीलच राजकीय पदाधिकाऱ्याचा एक भाऊ व गोव्यातील एकाचा समावेश आहे. यावेळी आरोपी व पथक कर्मचारी यांच्यात झटापट झाली. पण पथकाने शिताफीने आरोपींना अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथाकाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केली. दोडामार्ग कोकेन अमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याची टीप अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई साटेली मार्गावर केली. त्यांनी गोव्यातील एका संशयिताचा पाठलाग करत तो अमली पदार्थ कुणाला देत आहे, याची माहिती घेत हे पथक रात्री उशिरा दोडामार्ग येथे धडकले. त्यांनी दोडामार्गातीलच एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावाच्या जवळ असलेली दुचाकीची तपासणी केली. यावेळी दुचाकीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा आढळून आला. अमलीपदार्थ विरोधी पथकाने दुचाकीसह त्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावाला व अन्य एका संशयीत आरोपीला दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, हे प्रकरण अमली पदार्थ विरोधीपथकाच्या अखत्यारीतील असल्याने याबाबत दोडामार्ग पोलीस कोणतीही वाच्यता करीत नव्हते. या कारवाईची कल्पना अमली पदार्थ विरोधी पथकाने सिंधुदुर्ग पोेलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक गोवा अधिक्षक जितेंद्र रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)