परीक्षा संपल्यावर आरोपींवर कारवाई
By admin | Published: March 14, 2017 04:41 AM2017-03-14T04:41:45+5:302017-03-14T04:41:45+5:30
बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून चार पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. त्यातच व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल करणाऱ्यांना ताब्यात घेऊनही कारवाई न झाल्याने बोर्डावर टीका होत आहे
मुंबई : बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून चार पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. त्यातच व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल करणाऱ्यांना ताब्यात घेऊनही कारवाई न झाल्याने बोर्डावर टीका होत आहे. त्यामुळे संबंधितांवर परीक्षा संपल्यावर कारवाई करणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले.
बारावीचे पेपर परीक्षेच्या वेळेआधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणाऱ्या गय केली जाणार नाही, अशी भूमिका बोर्डाने स्पष्ट केली आहे. पण बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मुंबई विभागातून चार पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आतापर्यंत मराठी, एसपी, गणित आणि बुक किपिंगचा पेपर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी वाशी आणि कांदिवली पोलीस ठाण्यात बोर्डाने तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलनेही विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकाला अटक केली आहे.
पोलिसांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पण परीक्षांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सध्या कारवाई केलेली नाही. परीक्षा संपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)