युसूफ मेहरअली मार्गावर पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:57 AM2017-07-24T06:57:00+5:302017-07-24T06:57:00+5:30

मशीद रेल्वेस्टेशन येथील युसूफ मेहरअली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असताना यापूर्वी

Action again on Yusuf Mehr ali Road | युसूफ मेहरअली मार्गावर पुन्हा कारवाई

युसूफ मेहरअली मार्गावर पुन्हा कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मशीद रेल्वेस्टेशन येथील युसूफ मेहरअली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असताना यापूर्वी विरोध झाला होता. ही बाब लक्षात घेत महापालिकेने आता या मार्गावर राज्य राखीव पोलीस दलाच्या व मुंबई पोलीस दलाच्या मदतीने कारवाई केली. कारवाईदरम्यान युसूफ मेहरअली मार्गावरील ९० अनधिकृत फेरीवाले/वाढीव बांधकामे हटविण्यात आली. पी. डीमेलो मार्गाच्या पदपथावरील १५ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिणामी, येथील पदपथ मोकळा झाला आहे.
मशीद स्टेशनजवळ असणाऱ्या युसूफ मेहरअली मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याच्या आणि त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार या मार्गावरील अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. यानुसार करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दुकानदारास मुंबई पोलिसांनी अटक केली होती. कारवाईदरम्यान एकूण ९६ अनधिकृत फेरीवाले/वाढीव बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
याच रस्त्यावर नुकतीच दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. यापूर्वी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य राखीव पोलीस दल व मुंबई पोलीस दल यांचे विशेष सहकार्य घेत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर/अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार या मार्गावर नुकतीच दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आणि हा रस्ता मोकळा करण्यात आला. या कारवाईदरम्यान साधारणपणे ९० अनधिकृत फेरीवाल्यांवर/वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कर्नाक बंदर पुलाजवळील पी. डीमेलो मार्गाच्या पदपथावरील १५ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पदपथ मोकळा झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे सुलभ होण्यासोबतच रस्त्यावरील पादचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

कारवाईसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे सुमारे ३० जवान, मुंबई पोलीस दलातील २० कर्मचारी हे कारवाईस्थळी कार्यरत होते. महापालिकेच्या पथकामध्ये सुमारे ३० कामगार-कर्मचारी-अधिकारी कार्यरत होते. तसेच या कारवाईदरम्यान १ जेसीबी, १ ट्रक, अतिक्रमण विभागाच्या २ गाड्या इत्यादी यंत्रसामुग्री व वाहने वापरण्यात आली. या परिसरातील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील.
- उदयकुमार शिरुरकर,
सहायक आयुक्त, बी विभाग,
मुंबई महापालिका

Web Title: Action again on Yusuf Mehr ali Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.