रवी पुजारीसह १४ जणांवर कारवाई
By admin | Published: December 23, 2016 04:57 AM2016-12-23T04:57:48+5:302016-12-23T04:57:48+5:30
खंडणीसाठी आपल्या हस्तकांमार्फत बिल्डर, व्यावसायिकांसह बड्या राजकीय नेत्यांना धमकावणाऱ्या गँगस्टर रवी आणि सुरेश पुजारी
ठाणे : खंडणीसाठी आपल्या हस्तकांमार्फत बिल्डर, व्यावसायिकांसह बड्या राजकीय नेत्यांना धमकावणाऱ्या गँगस्टर रवी आणि सुरेश पुजारी यांच्यासह १४ जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील यश ऊर्फ रमेश पाटील याच्यासह ११ जणांना अटक केली आहे. या टोळीकडून आठ पिस्तूल, ३० काडतुसे, चार मॅगझिन आणि दोन मोटारसायकली असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
या टोळीतील रवी, सुरेश पुजारी आणि बिहारचा महेंद्र असे तिघे जण पसार आहेत. या सर्वांवर खंडणी, खुनाचा प्रयत्न, खून आणि हाणामारी असे तब्बल १४० गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या टोळीने प्रत्येक वेळी बड्या असामींकडे एक ते दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. परदेशातून रवी आणि सुरेश पुजारी हे दोघे टोळीची सूत्रे चालवत असून खंडणीसाठी त्यांनी मुंबई, ठाणे परिसरात गोळीबाराचे अनेक प्रकार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या वाढत्या कारवायांवर अंकुश आणण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कदम यांनी त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कारवाया, अर्थात मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त पराग मणेरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली.
यश ऊर्फ पप्या ऊर्फ प्रकाश ऊर्फ रमेश पाटील, विजयप्रकाश पुजारी, दयानंद अमिन ऊर्फ पुजारी, मिथुन ऊर्फ मिठ्ठू नीलमणी करमोकर, विष्णू ऊर्फ सोनी चंदुमल तेजवानी, नरेश गुजरण ऊर्फ भंडारी, हनुमंत गायकवाड, राहुल लोंढे, रवींद्र घारे, रोहन डिकोस्टा आणि इकलाख शेख अशी याप्रकरणी अटक केलेल्या ११ जणांची नावे आहेत. हे सर्व जण उल्हासनगर, नवी मुंबई आणि सोलापूर परिसरातील रहिवासी आहेत. यातील सुरेशवर २२ तर रवीवर ३५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उल्हासनगरचे बिल्डर सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयावर ११ जुलै २०१६ रोजी याच टोळीतील दोघा शूटर्सने गोळीबार केला होता. अलीकडेच मुंबईच्या विलेपार्ले येथील हॉटेलवरही खंडणीसाठी याच टोळीतील शूटर्सने गोळीबार केला. खंडणी उकळताना गोळीबार केल्यानंतर रवी पुजारीचा परदेशातील १२ अंकी मोबाइल क्रमांक देऊन ही टोळी पसार होत होती. (प्रतिनिधी)