'खाणाव कारखान्यातील कंत्राटदारांवर कारवाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:56 AM2018-07-18T05:56:50+5:302018-07-18T05:56:56+5:30
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत.
नागपूर : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत. यातील २४ कामगार कायम व अन्य कामगार कंत्राटी म्हणून काम करत आहेत. त्यांना किमान वेतन व अन्य फायदे मिळत नसल्याने संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.
नियम ९७ अन्वये शेकापचे जयंत पाटील यांनी याबाबतची अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर पाटील म्हणाले, की या कंपनीत २० वर्षापासून कामावर असलेल्या कामगारांची माथाडी कामगार म्हणून नोंद केलेली नसल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळत नाही.
कामगारांची होणारी पिळवणूक थांबावी. यासाठी याची सर्व चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील म्हणाले, या कंपनीत स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांची मागणी होती, ती रास्त होती.