दहावीच्या परीक्षेच्या कॉपीप्रकरणी पाच जणांवर कारवाई
By admin | Published: March 7, 2017 09:32 PM2017-03-07T21:32:34+5:302017-03-07T21:32:34+5:30
दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीचा हैदोस संदर्भातील व्हीडीओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवून संबंधित पाच जणांवर तातडीने कारवाईचे आदेश
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 7 : दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विसरवाडी, ता.नवापूर येथील केंद्रावरील कॉपीचा हैदोस संदर्भातील व्हीडीओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवून संबंधित पाच जणांवर तातडीने कारवाईचे आदेश काढले आहेत.
दहावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. मराठीच्या पहिल्या पेपरला काही केंद्रांवर कॉपी सुरू असल्याची चर्चा होती. विसरवाडी, ता.नवापूर येथील केंद्रावरील व्हीडीओ व्हायरल झाला. या केंद्रावर राजरोसपणे कॉपी पुरविणाऱ्यांचे चित्र समोर येताच जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक बोलवली़ प्रकरणाची गंभीर दखल घेत, त्या भागाचे विस्तार अधिकारी शामराव देवरे तसेच केंद्रप्रमुख मनोज साळवे यांना तातडीने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच केंद्रसंचालक एऩआऱ दशपुत्रे यांच्यासह दोन पर्यवेक्षकांना तातडीने निलंबित करावे, असे आदेश संबधित संस्थेला देण्यात आले़
दरम्यान, या केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख म्हणून मधुकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ बैठकीला जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे तसेच प्राथमिक व माध्यामिक जिल्हा शिक्षणाधिकारी उपस्थित होते़
निलंबनाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी यांनी येत्या दिवसात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी कठोर पावले उचलणार असल्याचे ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले़