‘लोटा बहाद्दरां’वर होणार गुड मॉर्निंग पथकाची कारवाई
By admin | Published: September 18, 2016 12:43 AM2016-09-18T00:43:25+5:302016-09-18T00:43:25+5:30
नगर परिषदेने शनिवार (दि. १७)पासून ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या ‘लोटा बहाद्दरां’वर कारवाई करण्यास सुरुवात केली
इंदापूर : नगर परिषदेने शनिवार (दि. १७)पासून ‘गुड मॉर्निंग’ पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या ‘लोटा बहाद्दरां’वर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक महिन्यांपासून बंद असलेले गुड मॉर्निंग पथक परत कार्यरत झाल्याने उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना पुन्हा एकदा त्रेधातिरपटीला सामोरे जावे लागणार आहे. माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे यांनी शहर स्वच्छ व निर्मलग्राम होण्यासाठी पुढाकार घेतला होता. गुड मॉर्निंग पथकाबरोबर ते स्वत: तसेच मुख्याधिकारी नानासाहेब कामठे जातीने फिरत होते. त्यांच्या कामगिरीमुळे सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंदापूर नगर परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. इजगुडे पदावरून पायउतार झाल्यानंतर ही मोहीम थंडावली होती. ती पुन्हा कार्यरत झाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत म्हणाल्या, की शहर स्वच्छ व निर्मलग्राम होण्याच्या दृष्टीने गुड मॉर्निंग पथक पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. या पथकाद्वारे उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार ताकीद देऊनही सवय न बदलणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाणार
आहे. ती टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर करावा. ज्यांच्याकडे ती
नाहीत, त्यांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
>या मोहिमेसाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे. वारंवार आवाहन करूनदेखील प्रतिसाद मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. ज्या नागरिकांनी शौचालय बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला; मात्र बांधकामाला सुरुवात केली नाही अशा नागरिकांनी अनुदानाची रक्कम परत नगर परिषदेकडे जमा करावी.
- नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी