अवैध धंद्यांवर धडक कारवाई
By admin | Published: June 10, 2016 01:20 AM2016-06-10T01:20:49+5:302016-06-10T01:20:49+5:30
मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत
यवत : परिसरातील अनेक गावांमध्ये खुलेआम दारूविक्री, अनेकांचे संसार उध्वस्त करून कंगाल करणारा मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे ही कारवाई सुरू असल्याची माहिती बेकायदा धंदे करणाऱ्यांच्या खबऱ्यांकडून मिळत आहे.
मागील काही दिवसांत यवत व परिसरात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट कारवाई सुरू केल्याने मद्यपींनी चांगलाच धसका घेतला आहे. मात्र मद्यपींवर कारवाई करताना यवत पोलीस दुजाभाव करत असल्याची भावना संबंधित कारवाई केलेले नागरिक व्यक्त करत होते. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर सुरू असलेले ढाबे व हॉटेलमधून बेकायदेशीपणे दारूविक्री सुरू असते. अशा हॉटेलच्या जवळपास थांबून दारू पिऊन जाणाऱ्या तळीरामांना पोलीस आपसूक पकडत होते. मात्र त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदा दारूविक्री करणाऱ्या हॉटेल चालकांवरच कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न संबंधित नागरिक व्यक्त करीत होते.
मागील दोन दिवसांत यवत येथील गावठाण परिसर व बाजार मैदानात सुरू असणारा मोठा मटक्याचा अड्डा बंद आहे. तेथे आठवडे बाजार दिवस वगळता असणारी मटकाबहाद्दर मंडळींची गर्दी गायब झाली आहे. कारवाई होणार असल्याचा सुगावा लागल्याने संबधित मटकेबहाद्दर फरार झाले असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक संदीप कदम, दीपक पालखे, महेश बनकर, शिपाई गणेश झरेकर, संपत खबाले, रणजीत निकम, शितोळे यांनी केली.
खुलेआम विक्रीमुळे तक्रारी वाढल्या...
अवैध दारूविक्री, मटके व जुगार अड्डे यांच्यावर कारवाई करताना स्थानिक पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कारवाई केली जाते. मात्र इतर वेळी सदर अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असतात. स्थानिक पोलिसांचे जास्तीच्या कामामुळे तिकडे किती वेळ लक्ष देणार, अशी तक्रार कायम असते.
तर अपुरे कर्मचारी असल्याचे अधिकारी वर्गाकडून कायम सांगितले जाते. ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.