‘भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरातील अनधिकृत गोदामांसंदर्भात कार्यवाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:33 AM2018-07-21T05:33:51+5:302018-07-21T05:34:11+5:30
भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
नागपूर : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
डॉ. पाटील म्हणाले, भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४५ अन्वये इमारत बांधकामासाठी विकास परवानगी दिली जाते. तथापि, प्राधिकरणातर्फे या इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या रासायनिक साठ्यासाठी वापर परवानगी दिली जात नाही. भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत एमएमआरडीएमार्फत अनधिकृत बांधकाम हे शासनाच्या २०१७च्या धोरणानुसार नियमित होते किंवा कसे याची प्रथमत: छाननी/पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कासनाची कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.
अनधिकृत गोदामांसंदर्भात शासनाच्या संबंधित विभागास पोलीस संरक्षण दिले जाईल व तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी या वेळी विचारलेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.