कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:29 PM2019-03-28T19:29:55+5:302019-03-28T19:30:17+5:30
साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे
पुणे : केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर निश्चित केल्यानंतरही अनेक कारखाने त्यापेक्षा दराने साखर विक्री करीत आहेत. अशा कारखान्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (ईसी अॅक्ट) कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी दिला.
साखरेला उठाव नसल्याने अनेक साखर कारखान्यांनी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपयांवरुन ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी साखर कारखाना संघटनांनी केली होती. किरकोळ बाजारातील भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील, त्यामुळे ग्राहकांचा रोष ओढवेल. हे टाळण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी साखर आयुक्तांनी सहकारी व खासगी साखर कारखान्यांची बैठक साखर संकुल येथे बोलावली होती.
मागील आठवड्यात कमी दराने साखर विक्री करणाऱ्या काही कारखान्यांची नावे समोर आली होती. किमान विक्री दरापेक्षा शंभर ते दीडशे रुपये कमी भावाने विक्री करीत असल्याचे सांगण्यात येत होते. कागदोपत्री असा कोणताही कारखाना आढळला नाही. त्यामुळे छुप्या पद्धतीने कमी दरात साखर विक्री करणाऱ्या कारखान्यांना आयुक्तांनी तंबी दिली. कमी दराने साखर विक्री केल्याने साखर बाजाराला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.२९) राज्यातील काही साखर कारखान्यांची चौकशी करण्यात येईल. यात कोणताही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.