निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: February 16, 2017 01:30 PM2017-02-16T13:30:13+5:302017-02-16T13:30:13+5:30
२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना शो-कॉज बजावण्यात आली आहे.
निवडणूक प्रशिक्षणाला
दांडी मारणाऱ्यांवर कारवाई
अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना शो-कॉज बजावण्यात आली आहे. मतदानप्रक्रिया आणि ईव्हीएमबाबत ९ फेब्रुवारीला झोननिहाय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. सांस्कृतिक भवनामध्ये महापालिकेच्यावतीने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
९ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १२ या कालावधीत झोन क्रमांक १ व २ आणि दुपारी १२ ते ५ या कालावधीत झोन क्रमांक ३ आणि ४ मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगाऊ सूचना देण्यात आली होती. मात्र, या प्रशिक्षणाला हमालपुरा झोन क्रमांक ४ मधील २१ अधिकारी कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे याप्रशिक्षणात मतदानप्रक्रिया आणि इव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट याबाबत सूक्ष्म माहिती देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील ८७ जागांसाठी ७३५ मतदान केंद्रांवरुन होत असलेल्या यानिवडणूक प्रक्रियेची व्यापकता लक्षात घेऊन प्रशिक्षण शिबिराला महत्त्व होते. यामहत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या ५ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र-१ चे ८, क्र, २ चे ३ आणि मतदान अधिकारी क्रमांक ३ चे ५ अशा एकूण २१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. हमालपुरा झोनचे निवडणूक अधिकारी मावळे यांनी या नोटीस बजावल्यात. (प्रतिनिधी)
९ फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात झोन चारमधील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण होते. याप्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या २१ केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.
- सुनील पकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २