जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास कारवाई
By Admin | Published: August 24, 2016 12:55 AM2016-08-24T00:55:06+5:302016-08-24T00:55:06+5:30
सर्वांनी नियमांचे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्यास आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते.
पिंपरी : शहरातील सार्वजनिक मंडळांना एकाच ठिकाणी परवानगी देण्यात येईल. सर्वांनी नियमांचे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्यास आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नका, पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात महापालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शांतता बैठक झाली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, राम मांडुरके, वैशाली जाधव-माने शिंदे उपस्थित होते.
पोलीस आयुक्त शुक्ला यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या. नियमांचे पालन, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस परवाना प्रक्रिया सुलभ केली आहे. एकाच ठिकाणी परवाने मिळतील.’’
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ‘‘प्रत्येक विसर्जन घाटावर निर्माल्यकलश ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत ज्याप्रमाणे इकोफे्रंडली गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही. याची काळजी मंडळांनी घ्यावी. (प्रतिनिधी)
>प्रत्येक पोलीस ठाण्यातर्फे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, मंडळांच्या अध्यक्षांना त्यात समाविष्ट करुन घेतले जाणार आहे.
- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त