कोपरखैरणेतील अतिक्रमणांवर कारवाई
By Admin | Published: June 9, 2017 02:38 AM2017-06-09T02:38:36+5:302017-06-09T02:38:36+5:30
महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ९ येथील अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ९ येथील अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. सिडकोच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत जवळपास ७५00 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
बुधवारी सिडकोच्या वतीने याच परिसरात धडक मोहीम राबवून जवळपास पाचशे कोटी रुपये किमतीचा भूखंड मोकळा करण्यात आला होता. अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर याच परिसरात ७५00 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या अतिक्रमणावर बुधवारी महापालिका आणि सिडकोने संयुक्त कारवाई केली. याअंतर्गत व्यावसायिक गाळे, गोडाऊन, फर्निचरची दुकाने व काही झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
दरम्यान, दोन दिवसांत अतिक्रमणमुक्त झालेल्या या भूखंडांची निविदा काढून विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात स्वतंत्र मार्केटिंग सेल तयार करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून मोकळे झालेले भूखंड निविदा काढून विकले जाणार आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग प्रमुख अशोक मढवी, सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक पी.पी. राजपूत, सहायक नियंत्रक गणेश झिने आदी उपस्थित होते. या मोहिमेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.