उलवेतील अतिक्रमणावर कारवाई
By admin | Published: April 29, 2016 03:23 AM2016-04-29T03:23:51+5:302016-04-29T03:23:51+5:30
उलवे नोडमधील शेलघर गावात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली.
नवी मुंबई : उलवे नोडमधील शेलघर गावात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली. हे बांधकाम हॉटेलसाठी उभारले जात होते. परिसरात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उलवे येथील अशोक के. घरत यांनी उभारलेल्या या बांधकामाला सिडकोच्या अतिक्रमण विभागाने रीतसर एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. घरत यांनी या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर आवश्यक असलेली विकास परवानगी प्राप्त न झाल्यास ९० दिवसांच्या आत आपण स्वत: हे बांधकाम निष्कासित करू असे प्रतिज्ञापत्र घरत यांनी न्यायालयात सादर केले होते. परंतु त्यांनी असे न केल्याने सिडकोने बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पाडून टाकले. दरम्यान, या कारवाईत अडथळा आणण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आले. अनधिकृत बांधकाम स्थळावर जात असताना मुख्य रस्त्यावर ३० फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला होता. तसेच रस्त्याच्या मधोमध मोठमोठे दगड ठेवून कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात विरोध केला. परंतु सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कोणताही अडथळा व विरोध न जुमानता दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत सदर बेकायदा इमारत जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)