शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई
By admin | Published: April 4, 2017 03:39 AM2017-04-04T03:39:13+5:302017-04-04T03:39:13+5:30
शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. एकाच दिवसामध्ये तब्बल ९०० फेरीवाले हटविण्यात आले असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली होती. याविषयीचे वृत्त लोकमतने ३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पालिका प्रशासनाने बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या आठही प्रभागांमध्ये एकाच वेळी मोहीम राबविण्यात आली. रोड, पदपथ, रहदारीला अडथळा होईल अशा ठिकाणी बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. रसवंतीगृह, खाद्यपदार्थ विक्री व बनविणारे, हॉटेलसह इतर दुकानांच्या बाहेर ठेवलेले साहित्यही जप्त केले आहे. पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये यासाठी त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून ते कोपरखैरणेमधील जुन्या क्षेपणभूमीवरील गोडावूनवर ठेवण्यात आले आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिक्रमण उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात कुठेही अनधिकृतरीत्या व्यवसाय होत असेल व फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही हटविण्यात येणार असल्याचे सर्व विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात एकाच दिवशी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे.