फेरीवाले, वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 01:52 AM2017-05-14T01:52:50+5:302017-05-14T01:52:50+5:30
गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.
शुक्रवारी फेरीवाल्यांची संख्या तुरळक होती. परंतु, सॅटीसखाली बेकायदा पार्क केलेल्या दुचाकी मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. तसेच स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत रस्त्यांवर बेकायदा पार्क केलेल्या वाहनांची हवा काढण्यात आली. या वेळी काही ठिकाणी किरकोळ वादही झाल्याचे दिसून आले. परंतु, जोपर्यंत स्टेशन परिसरातील
फेरीवाले हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी दिला.
ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांच्यावरील हल्ल्यानंतर गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे स्थानक व गावदेवी भागाचा दौरा करून गावदेवी येथील २७ गाळे जमीनदोस्त केले. त्यानंतर ठाणे स्थानक परिसरात बेशिस्तपणे उभ्या रिक्षाचालकांनाही चोप दिला होता.
>कारवाईदरम्यान वाद; पण कारवाई सुरूच
पथकाने या भागातील दुचाकी उचलून वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. या कारवाईनंतर हे पथक पुन्हा अशोक टॉकीजच्या परिसरात गेले आणि तेथून पथक मुख्य बाजारपेठ रस्त्याच्या दिशेने निघाले. या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा
ठरणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे दुतर्फा उभ्या केलेल्या आलिशान कारसह दुचाकींच्या चाकामधील हवा पालिकेच्या पथकाने काढली. त्या वेळी काही वाहनचालकांसोबत वादही झाला.