लेन कटिंगवर कारवाई!
By Admin | Published: July 23, 2016 05:04 AM2016-07-23T05:04:48+5:302016-07-23T05:04:48+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि अवजड वाहने व मोठ्या गाड्या सतत पहिल्या लेनमधून जातात
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि अवजड वाहने व मोठ्या गाड्या सतत पहिल्या लेनमधून जातात, लेन कटींग करतात त्यामुळे होणारे अपघात वाचविण्यासाठी अशा गाडींच्या चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
तुम्ही अमूक आदेश काढू, तमूक करु असे बोलत राहता, तुमचे आदेश निघेपर्यंत तिकडे लोकांचे जीव जात आहेत. नुसते बोलू नका, तर कठोर पावलं उचला. पहिल्या लेनमधून जाणाऱ्या ट्रक चालकांवर काय कारवाई करणार, असा सवाल आ. सुनील तटकरे यांनी केला, तर बेळगाव ते कोल्हापूर महामार्ग कसा आहे हे एकदा जाऊन पाहा, असा सल्ला किरण पावसकर यांनी दिला.
त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, एक्स्प्रेस वेवरील समोरच्या लेनमधील वाहनांच्या प्रकाशझोतापासून वाहनांना वाचवण्याकरीता केवळ झाडांच्या उंचीवर भर न देता त्यांच्या सुशोभिकरणावरदेखील भर देण्यात येईल, याकरिता तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
>हयगय चालणार नाही
>मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरक्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नसून कंत्राटदाराला बिलकूल पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.