पक्षादेश झुगारणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: May 17, 2016 04:30 AM2016-05-17T04:30:46+5:302016-05-17T04:30:46+5:30
विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यास कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कारणे दाखवा नोटीस
राजू काळे,
भार्इंदर- प्रभाग समिती सभापती निवडणुकीवेळी अनुपस्थित राहून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यास कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाने कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त लोकमतच्या हॅलो ठाणे पुरवणीत १५ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी म्हात्रे यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. म्हात्रे यांना सोमवारी (१६ मे) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले.
२९ एप्रिलच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत प्रभाग १ ते ५ मधील काही निवडणुका बिनविरोध, तर काही पक्षीय बलाबलानुसार पार पडल्या. प्रभाग ६ मध्ये मात्र राष्ट्रवादीचे ९, भाजपाचे ५, सेनेचे २ व बहुजन विकास आघाडीचे २ सदस्य असल्याने सेना-भाजपा युतीचे मिळून ७ तर बविआच्या २ सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने दोन्ही बाजूंकडील सदस्यसंख्या प्रत्येकी ९ झाल्याने येथील निवडणूक चमत्कारिक ठरणार होती.
दोन्ही बाजूंकडून राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांना समान मतदान झाल्यानंतर लॉटरी काढण्यात येणार, हे जवळपास ठरले होते. परंतु, नेहमीप्रमाणे या प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग ४० मधील राष्ट्रवादीचे नगसेवक परशुराम म्हात्रे यांनी पक्षादेश असतानाही निवडणुकीला उपस्थित राहणे टाळले.
याबात त्यांनी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देताच थेट भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप पक्ष पदाधिकाऱ्यांनी करण्यास सुरुवात केली.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवार दक्षता ठाकूर यांना विजयी करण्यासाठी माजी खा. संजीव नाईक यांच्यासह विरोधी पक्ष नेते लियाकत शेख यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, ऐन निवडणुकीवेळी शब्द दिलेल्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे ठाकूर यांचा पराभव झाला. त्यातच म्हात्रे यांची बंडखोरी पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्यानंतरही पक्षाने म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या
पक्षाच्या बैठकीत म्हात्रे यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पक्षातील
लोकांची नाराजी उफाळून आल्यानंतरही पक्षाला कारवाईची आठवण न झाल्याने पक्षात विरोधाभास निर्माण होऊ लागला.