आंब्याबाबत दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: March 27, 2017 04:12 AM2017-03-27T04:12:57+5:302017-03-27T04:12:57+5:30
आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून
पुणे : आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिला.
कृषी पणन मंडळातर्फे मुख्यालयाबाहेर थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले, हंगाम सुरू झाल्यानंतर दरवर्षी आंंबा पिकविण्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. आंबा पिकविण्यासाठी विविध कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. आंब्याला रंग आणणे, आकार वाढविणे यासाठीही काही कंपन्यांकडून जाहिरातबाजी केली जाते. त्यावर कृषी विभागाचे सातत्याने नियंत्रण असते. काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल केली जाते. रसायनचा अंश असलेला आंबा ग्राहकांपर्यंत जाण्यामध्ये थेट शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचा दोष नाही. तर मूळ कंपन्यांकडून चुकीचे मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)
यंदा सुमारे दीड लाख हेक्टरवर आंबा क्षेत्र असून साडेचार हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाचा अंदाज १० लाख मेट्रिक टन एवढा होता. मात्र, त्यापेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. शेतमलाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्यभर आंब्यासह काजू, बेदाणा आदी शेतमालाचे महोत्सव भरविण्याचे प्रयत्न पणन मंडळाकडून सुरु आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.