आदर्शप्रकरणी सूडबुद्धीने कारवाई
By admin | Published: January 30, 2016 01:48 AM2016-01-30T01:48:28+5:302016-01-30T01:48:28+5:30
भाजपाप्रणित सरकारची लोकविरोधी धोरणे आमचा पक्ष चव्हाट्यावर आणत असल्याने सरकारने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे, असा आरोप
मुंबई : भाजपाप्रणित सरकारची लोकविरोधी धोरणे आमचा पक्ष चव्हाट्यावर आणत असल्याने सरकारने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत केला.
मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीप्रकरणी राजकीय आकसापोटी कायदेशीर पैलुंचा विचार न करता भाजपा सरकारने सीबीआयवर दबाव आणून राज्यपालांना माझ्याविरूद्ध खटला चालविण्याची परवानगी मागण्यास भाग पाडले, असा आरोपही चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, या मुस्कटदाबीला काँग्रेस भीक घालणार नाही. खा. किरीट सोमय्या राजभवनचे किंवा सीबीआयचे प्रवक्ते नाहीत. तरीही ते राज्यपाल काय निर्णय घेणार किंवा सीबीआय काय कारवाई करणार, याचे सूतोवाच करीत राहतात. याचाच अर्थ विरोधकांवर काय कारवाई करायची, याची योजना भाजपच्या स्तरावर आखली जात असून, ती कारवाई तडीस नेण्यासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू असल्याची शंका येते, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षातील नेत्यांवर बिनबुडाच्या आरोपांखाली कारवाई करणारे हे सरकार भाजपा नेत्यांच्या गैरव्यवहाराबद्दल मात्र चकार शब्द काढत नाही. भाजपा नेत्यांवरील आरोपांची चौकशीही केली जात नाही. यातून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असा पलटवार खा. चव्हाण यांनी केला. आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणामध्ये आपले नाव आरोपपत्रातून वगळण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. याबाबत सीबीआय व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे नोटीससुद्धा दिलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)
कर्जमाफीच द्या
सरकारने शेतक-यांसाठी अनेक पॅकेज जाहीर केले. परंतु, या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कमी झालेले नाही. याचाच अर्थ सरकारच्या पॅकेजमुळे शेतक-यांचे नैराश्य कमी झालेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मनरेगाची दशकपूर्ती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) २ फेब्रुवारी २००६ रोजी लागू झाली होती त्या घटनेला येत्या २ तारखेला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वाकांक्षी योजनेची दशकपूर्ती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संत एकनाथ रंगमंदिर सिडको, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चर्चासत्र होणार असल्याची माहिती खा. चव्हाण यांनी दिली.