नाशिकच्या गुंतवणूक कंपनीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 03:16 AM2016-05-17T03:16:30+5:302016-05-17T03:16:30+5:30

सात जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री जेरबंद केल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

Action on Nashik Investment Company | नाशिकच्या गुंतवणूक कंपनीवर कारवाई

नाशिकच्या गुंतवणूक कंपनीवर कारवाई

Next


औरंगाबाद : तीन राज्यांतील सहा हजारांवर गुंतवणूकदारांना तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या ‘ट्रू लाईफ व्हिजन प्रा. लि.’ कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक दीपक जिभाऊ सूर्यवंशी याच्यासह सात जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री जेरबंद केल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
दीपक सूर्यवंशी (३७, रा. कामटवाडे, नाशिक), शंकर प्रकाश निकम (३६, रा. शेंदुरवादा, जि. औरंगाबाद), राजेंद्र दादासाहेब भुसे (३५, रा. चापडगाव, जि.नगर), अरुण चंद्रभान मोगल (३०, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद), परमेश्वर रावसाहेब लोंढे (२९, रा. नीलजगाव फाटा, जि. औरंगाबाद) आणि रविराज जवाहर राठोड (२७, रा. देवळाई चौक, औरंगाबाद) यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेला पोलीस आयुक्तांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
दीपक सूर्यवंशीने वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या ‘ट्रू लाईफ व्हिजन प्रा. लि.’ कंपनीवर आर्थिक गुन्हे शाखा लक्ष ठेवून होती. औरंगाबादमध्ये रविवारी कंपनीचा वर्धापन दिन होता. त्यासाठी १,८०० पेक्षा अधिक गुंतवणूकदार उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पोलिसांनी सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले.
गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘केबीसी’ कंपनीचा म्होरक्या भाऊसाहेब चव्हाण हा नाशिकचाच आहे. ‘ट्रू लाईफ’चा ‘केबीसी’शी काही संबंध आहे काय, याची तपासणी करणार असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.
>तीन राज्यांत जाळे
महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये ‘ट्रू लाईफ’ने जाळे विणले होते. साखळी पद्धतीने जास्तीत जास्त सभासद करणाऱ्यांना क्रमाक्रमाने सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम, रुबी, डायमंड व क्राऊन क्लबमध्ये प्रवेश देऊन करोडपती केले जाईल, असे आमिष सूर्यवंशीने दाखविले होते. ३,७०० ते ५,००० रुपयांपर्यंतची रक्कम सभासदांना कंपनीच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यावर जमा करण्यास भाग पाडले जात होते. त्यातून ६,३०० सभासदांकडून तीन कोटी रुपये जमा करण्यात आले होते.
>नाशिकमध्ये झाडाझडती
औरंगाबाद पोलिसांच्या पथकाने सूर्यवंशीच्या कामटवाडे भागातील सिद्धीविनायक ब्लासम अपार्टमेंटमधील फ्लॅटची तसेच त्याच्या कार्यालयाची झडती घेण्याचे काम सुरू आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असून, कार्यालयास सील ठोकण्यात आले आहे.

Web Title: Action on Nashik Investment Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.