फेरीवाल्यांवर रात्रीही कारवाई,प्रामुख्याने रेल्वेजवळील परिसर होणार फेरीवालामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:10 AM2017-09-20T02:10:17+5:302017-09-20T02:10:18+5:30
रस्त्यावरच दुकान टाकून सामान विकणा-या अनधिकृत फेरीवाल्यांची महापालिकेची गाडी बघताच पळापळ सुरू होते. मात्र, गाडी निघून गेल्यावर अथवा पालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर, अनधिकृत फेरीवाले बिनधास्त रस्त्यावर ठाण मांडत आहेत.
मुंबई : रस्त्यावरच दुकान टाकून सामान विकणा-या अनधिकृत फेरीवाल्यांची महापालिकेची गाडी बघताच पळापळ सुरू होते. मात्र, गाडी निघून गेल्यावर अथवा पालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर, अनधिकृत फेरीवाले बिनधास्त रस्त्यावर ठाण मांडत आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्यामुळे अशा फेरीवाल्यांवर रात्री ११.३० पर्यंत कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी २४ विभागांत प्रत्येकी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाची गस्त विशेषत: रेल्वे स्थानकांच्या परिसरात असणार आहे.
मुंबईत बºयाच ठिकाणी व प्रामुख्याने रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात, महापालिकेच्या कार्यालयीन वेळानंतर काही अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले रात्री उशिरा पदपथ व रस्त्यांवर ठाण मांडून असतात. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे वाहतूककोंडी, पादचाºयांना त्रास, याबरोबरच अनधिकृत विक्रेत्यांकडील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसंदर्भात अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, विभाग स्तरावर विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रत्येक पथकात आठ कामगार-कर्मचारी असून, सर्व २४ पथकांमध्ये एकूण १९२ कर्मचारी आहेत, तसेच या प्रत्येक पथकासोबत पोलीस बळ मिळण्यासाठीही महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
।असे असेल
विशेष पथक
विभाग स्तरावर स्थापन प्रत्येक पथकात आठ कामगार-कर्मचारी असणार आहेत. याप्रमाणे, सर्व २४ पथकांमध्ये एकूण १९२ कर्मचारी आहेत. प्रत्येक पथकाला एक अतिक्रमण निर्मूलन वाहन देण्यात येणार आहे. विभाग स्तरीय सहायक आयुक्तांच्या सूचनेनुसार पथकातील अनुज्ञापन निरीक्षक या पथकाच्या कामाचे समन्वयन करणार आहेत. त्यांना महापालिकेद्वारे सिम कार्डसह मोबाइल देण्यात येणार आहे.
।गॅस सिलिंडर असल्यास पोलिसांत तक्रार
नागरी सेवा-सुविधांबाबत तक्रारींसाठी असणाºया, १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर येणाºया अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाल्यासंबंधीच्या तक्रारी, तसेच पालिकेच्या संकेतस्थळाद्वारे येणाºया तक्रारी, तत्काळ कारवाईसाठी नव्याने गठित करण्यात आलेल्या पथकाकडे प्राधान्याने देण्यात येणार आहेत, तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गॅस सिलिंडर व रॉकेल आढळून आल्यास, त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचीही जबाबदारी, या पथकांकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली.
>महापथकाद्वारे अचानक धाड
प्रत्येक गुरुवारी सर्व विभाग स्तरीय पथक एकत्रित येऊन तयार होणाºया महापथकाद्वारे अचानक कारवाई करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, महापालिकेच्या ‘परिमंडळ १’ मध्ये ए, बी, सी, डी व ई या ५ विभागांमध्ये प्रत्येकी आठ, याप्रमाणे एकूण ४० कर्मचारी विशेष पथकामध्ये आहेत.
दर गुरुवारी हे महापथक एकाच वेळी व एकाच ठिकाणी अचानकपणे धडक कारवाई करणार आहे. यानुसार, महापालिकेच्या सर्व सात परिमंडळांमध्ये दर गुरुवारी धडक कारवाई होणार आहे.
पोलीस बळाची मागणी
या प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पोलीस दलाकडे महापालिका विनंती करणार आहे.