धान्य न उचलणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 03:34 AM2017-01-05T03:34:50+5:302017-01-05T03:34:50+5:30
स्वस्त धान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक दुुकानदारांकडे नोंदविण्यास विरोध म्हणून चालू महिन्याच्या धान्याची उचल न करणाऱ्याचा निर्णय रास्त
पुणे : स्वस्त धान्य आणि केरोसीन मिळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक दुुकानदारांकडे नोंदविण्यास विरोध म्हणून चालू महिन्याच्या धान्याची उचल न करणाऱ्याचा निर्णय रास्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. अशा दुकानदारांना शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी (एफडीओ) नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मुदतीत धान्य न उचलल्यास, जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे.
स्वस्त धान्य आणि केरोसिनचा काळाबाजार रोखण्यासाठी आधार क्रमांक असलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच केरोसिन-धान्य देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासून या अध्यादेशाची काटेकोर अंमलबजावणी शहर पुरवठा विभागाने सुरू केली.
शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार क्रमांक नाहीत त्यांच्या नावे दिले जाणारे धान्य राखून ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी आधार क्रमांक दुकानदारांकडे नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले. आधार क्रमांकाची नोंद केल्यानंतर राखून ठेवलेले धान्य आणि केरोसिन संबंधित शिधापत्रिकाधारकाला पुढील महिन्यात वितरित करण्यात येणार होते. त्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत निश्चित करण्यात आली होती.
मात्र, दुकानदारांनी त्याला विरोध सुरू केला. धान्याचे कमिशन परवडत नाही. दुकानभाडे, वीजबिल व कामगारांचा पगार भागविणे शक्य होत नसल्याची भूमिका घेत, कमिशन वाढवून दिल्याशिवाय धान्याची उचल करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानुसार चालू जानेवारी महिन्याचे धान्य आणि केरोसिन न उचलणाऱ्या दुकानदारांना शहर पुरवठा विभागाकडून नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.
चालू महिन्याच्या धान्याची उचल करून २५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांना वितरित करा; अन्यथा परवाना रद्द करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना परिमंडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले.