ही कारवाई म्हणजे पाकिस्तानला सणसणीत चपराक नाही - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 05:13 PM2017-05-23T17:13:36+5:302017-05-23T17:26:28+5:30
"सामना" या आपल्या मुखपत्रातून सातत्याने पाकिस्तानवर कारवाईची मागणी करणा-या शिवसेनेने भारतीय सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - "सामना" या आपल्या मुखपत्रातून सातत्याने पाकिस्तानवर कारवाईची मागणी करणा-या शिवसेनेने भारतीय सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले आहे. भारतीय लष्कराने कारवाई जरुर केली पण त्याने आमचे समाधान झालेले नाही. ही कारवाई म्हणजे पाकिस्तानला सणसणीत चपराक म्हणता येणार नाही. यापेक्षाही धडाकेबाज कारवाई करुन पाकिस्तानचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिली.
भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या तोफगोळयांचा तुफान वर्षाव करुन नष्ट केल्या. या कारवाईचा व्हिडीओ लष्कराने सार्वजनिक केला आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून लष्कराचे कौतुक सुरु आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर लष्कराने केलेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
देर आए, दुरुस्त आए, आता थांबायचे नाही. लाहोरमध्ये जाऊन तिरंगा फडकवायचा आहे अशा शब्दात दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कौतुक केले. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत होती. पाकिस्तानचा प्रश्न मोदी कधी मिटवणार ?, आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार का ? असे प्रश्न अग्रलेखातून विचारले जात होते.
गोळीला गोळीने उत्तर देण्याचे आपले धोरण बाजूला ठेवत भारतीय लष्कराने गोळीला तोफगोळयाच्या वर्षावाने उत्तर दिले.एकापाठोपाठ एक स्फोट घडवून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्यात 10 ते 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा अंदाज सुरक्षातज्ञांनी व्यक्त केला आहे. 20 आणि 21 मे रोजी केलेल्या या कारवाईची माहिती लष्कराने पत्रकारपरिषद घेऊन दिली.
Main isko karara jawab nahi maanta hoon,haan karyavahi zarur hai: Sanjay Raut,Shiv Sena on Indian Army destroys Pak Army posts in #Nausherapic.twitter.com/owB10VP2bY
— ANI (@ANI_news) May 23, 2017