‘पीएफआय’वर कारवाई; मतांचे ध्रुवीकरण होणार?

By संदीप प्रधान | Published: October 3, 2022 08:26 AM2022-10-03T08:26:28+5:302022-10-03T08:27:57+5:30

मुंबई, ठाण्यातील महापालिकांच्या निवडणुकीत हा पक्ष पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याने दोन्ही बाजूंकडील मतांच्या ध्रुवीकरणाला या कारवाईमुळे लाभ होण्याची शक्यता आहे.

action on pfi and votes will be polarized | ‘पीएफआय’वर कारवाई; मतांचे ध्रुवीकरण होणार?

‘पीएफआय’वर कारवाई; मतांचे ध्रुवीकरण होणार?

googlenewsNext

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

दक्षिणेकडील राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची (पीएफआय) विचारधारा मानणाऱ्या सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या राजकीय पक्षाला चांगले यश मिळाले आहे. पीएफआयवर जरी केंद्र सरकारने बंदी लागू केली असली तरी एसडीपीआय पक्षावर बंदी लागू केलेली नाही. मुंबई, ठाण्यातील महापालिकांच्या निवडणुकीत हा पक्ष पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याने दोन्ही बाजूंकडील मतांच्या ध्रुवीकरणाला या कारवाईमुळे लाभ होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील काही शहरांमधील पूर्वेतिहास पीएफआयसारख्या कट्टर संघटनांना खतपाणी घालणारा निश्चितच आहे.

कर्नाटक व केरळ या राज्यांमध्ये पीएफआय ही संघटना प्रभावी आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात या संघटनेचे कार्य दृश्य स्वरूपात दिसणारे आहे. मात्र, भिवंडीसारख्या शहरात तर ही संघटना फारशी कुणाला माहीत नाही. मुस्लिम समाजाचे एकत्रीकरण करण्याकरिता पीएफआयने मुंब्र्यातील दारुल फला मशिदीपाशी मागे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याखेरीज मुस्लिमांच्या प्रश्नांवर आंदोलन केल्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. 

पीएफआयच्या ज्या पदाधिकाऱ्यांना मुंब्रा, भिवंडी व कल्याण परिसरातून अटक केली, त्यांना चांगल्या वर्तणुकीची हमी देऊन जामिनावर सोडण्यात आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात तरी या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर कट्टरतावादी वक्तव्य, कृती याचे थेट आरोप नाहीत. ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या मुद्द्यापेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रभावी ठरू शकतो. अशावेळी मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही कारवाई पूरक ठरण्याचीच शक्यता आहे.

भिवंडीत दंगल व हिंसाचार

भिवंडी शहराला यापूर्वी दंगल व धार्मिक हिंसाचाराची पार्श्वभूमी राहिली आहे. १९८४ साली भिवंडीत दंगल झाली होती. त्यानंतर भिवंडीतील कोटरगेट येथील मशिदीपासून काही अंतरावर कब्रस्तानाच्या शेजारील शासकीय मालकीच्या भूखंडावर २००६ मध्ये निजामपुरा पोलीस ठाणे उभारणीचा निर्णय घेऊन भूमिपूजन केले गेले.
५ जुलै २००६ रोजी रझा अकादमी या संघटनेने पोलीस स्टेशन उभारणीस विरोध करण्याकरिता निदर्शने केली. जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात तत्कालीन पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. 

जमावाला पांगवण्याकरिता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद भिवंडीत उमटले. सहा एस.टी. बसगाड्या जाळण्यात आल्या. रात्रीच्या वेळी निजामपुरा परिसरात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी रमेश जगताप व बाळू गांगुर्डे यांना दगडाने ठेचून जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर भिवंडी आजतागायत शांत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याच्यामुळे पडघा - बोरिवली हे गाव चर्चेत आले होते.

मुंब्रा, कल्याणमधून दहशतवादी अटकेत

मुंब्रा परिसरातून आतापर्यंत किमान सहा जणांना दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. प्रयागराज येथे गंगा नदीत विष टाकण्याच्या संशयावरून इसिसचा कार्यकर्ता सलमान खान, मोहसीन खान, मजहर शेख, फहाद शाह आणि तकीउल्ल खालिद यांना तीन वर्षांपूर्वी एटीएसने अटक केली होती. रिझवान मोमीन याला एका प्रकरणात २० सप्टेंबर २०२१ रोजी अटक केली होती. कल्याणमधून एका शिक्षकाला इसिसशी संबंध असल्यावरून ताब्यात घेतले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: action on pfi and votes will be polarized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.