लातूरच्या पाणीटंचाईसाठी कृती आराखडा
By admin | Published: December 22, 2015 02:02 AM2015-12-22T02:02:46+5:302015-12-22T02:02:46+5:30
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली,
नागपूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यासाठी १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीकरिता ३१३८.१७ लक्ष रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आलेला होता. तसेच जून २०१५ अखेर अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे १ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालवधीकरिता ६९२.८१ लक्ष रुपयांचा आकस्मिक टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. टंचाई कृती आराखड्याची आवश्यकतेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत टंचाई निवारणार्थ एकूण १४६७ उपाययोजना राबवण्यात आल्या असून सदर उपाययोजनांवर १६१४.४९ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी शासनकडून आतापर्यंत १५४०.६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)