नेरूळमध्ये धार्मिक स्थळांवर कारवाई
By Admin | Published: June 29, 2016 02:10 AM2016-06-29T02:10:00+5:302016-06-29T02:10:00+5:30
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळमधील पदपथ, पूल व इतर रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या पाच धार्मिक स्थळांवर कारवाई केली.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळमधील पदपथ, पूल व इतर रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या पाच धार्मिक स्थळांवर कारवाई केली. पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी पदपथ, रोड व इतर मोकळ्या जागांवर धार्मिक स्थळ तयार करून जागा अडविण्यात आली होती. काही ठिकाणी मार्केट व इतर महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असलेल्या भूखंडावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी पालिकेने यापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यामधील कायम करता न येणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी नेरूळ सेक्टर १० मधील साईबाबा हॉटेलशेजारील साई मंदिर, सेक्टर ६ मधीन दर्शन दरबारकडे जाणाऱ्या कॉर्नरवरील व त्याच परिसरातील दुसऱ्या मंदिरावरही कारवाई करण्यात आली. डी. वाय. पाटील संकुल व राजीव गांधी पुलाखाली असलेल्या छोट्या मंदिरावरही कारवाई करण्यात आली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपआयुक्त सुभाष इंगळे, कैलास गायकवाड, विभाग अधिकारी उत्तम खरात व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला होता. (प्रतिनिधी)