पीएमपीच्या २४ बसवर आरटीओची कारवाई
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:45+5:302014-06-05T22:31:10+5:30
रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे.
मे महिना : ओव्हरलोड प्रवासी ठरले डोकेदुखी
पुणे : रस्त्यावर उतरणा-या बसची संख्या कमी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक पीएमपीला करावी लागत आहे. परंतु या बस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने आरटीओतर्फे कारवाई करण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात २४ पीएमपीवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा ओव्हरलोड बसवर दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
ओव्हरलोड प्रवाशांची वाहतूक करणे धोकादायक आहे. मुळात पीएमपीएलच्या ताफ्यात बसेसची संख्या कमी असल्याने, सर्वच मार्गावर बसची संख्या तसेच फेर्या कमी पडत आहेत. त्यामुळे कंडक्टर आणि ड्रायव्हर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये घेतात. त्यामुळेच बस ओव्हरलोड होते. सद्यस्थितीत पीएमपीएलकडे १२६७ बसेस आहेत. तर ठेकेदारांच्या ६८२ बसेस आहेत. ज्या बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. त्याकडून दंड वसूलीचे काम सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
क्षमतेपेक्षा अधिकच्या प्रवाशांची पीएमपीएलने वाहतूक करु नये, अशी सुचना आरटीओच्या वतीने पीएमपीएलला देण्यात आली होती. मात्र सुचनेला केराची टोपली दाखवित अधिकच्या प्रवाशंाची वाहतूक सुरुच ठेवली आहे. दुदैवाने ओव्हरलोड बसला एखाद्या वेळी अपघात झाल्यास प्रवाशांना अधिक धोका असतो. मागच्या आणि पुढच्या दारात प्रवासी लोबकाळत असतात. त्यामुळे बसच्या बाजूने कोणते वाहन येत आहे, हे चालकाला कळतच नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून पीएमपीएलच्या अपघातात वाढ झाली आहे.
'पीएमपीवर होणा-या कारवाईतून धडा घेणे गरजेची आहे. प्रवाशांना चांगली सेवा तसेच सुरक्षित प्रवास देण्यासाठी आम्ही क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसमध्ये न घेण्याचा प्रयत्न करु. तसेच वाहतूकीचे सर्वच नियम पाळण्याचा प्रयत्न करु.'
-प्रशांत जगताप, संचालक, पीएमपीएल.