शिवसेनेवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:46 AM2018-05-28T04:46:35+5:302018-05-28T04:46:35+5:30
पालघर पोटनिवडणुकीत भाजपा - शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या ‘आॅडिओ क्लिप’ वरून आमनेसामने आले आहेत. १४ मिनिटांची ही क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे.
मुंबई - पालघर पोटनिवडणुकीत भाजपा - शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या ‘आॅडिओ क्लिप’ वरून आमनेसामने आले आहेत. १४ मिनिटांची ही क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास माझ्यावर कारवाई करावी. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत अर्धवट आणि फेरफार केलेली क्लिप ऐकवण्यात आली. अर्धवट, फेरफार केलेली क्लिप दाखविणे हाच गुन्हा आहे. त्यामुळे शिवसेनेवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
पालघर प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यावेळी त्यांच्या पायात चपला होत्या, यावरून शिवसेनेने योगी आणि भाजपावर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर जनसंघ आणि भाजपा छत्रपती शिवरायांची पूजा करत आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवरायांबाबत भाजपाला काही शिकविण्याची गरज नाही. चार वर्षांतील मोदी सरकारचे यश हे भाजपासह सर्व घटकपक्षांचे यश आहे. पण, त्याचे श्रेय शिवसेनेला घ्यायचे नसेल तर त्याला आम्ही काय करणार, असेही ते म्हणाले.
युतीबाबत शिवसेना नेत्यांकडून होणाऱ्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेते आहेत. अन्य कोणी काय बोलतो याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे जी काही चर्चा होईल ती फक्त उद्धव ठाकरे यांच्याशीच होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘झोपेचे सोंग घेणाºयाला
कसे जागे करणार?’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘साम-दाम-दंड-भेद’चा अर्थ स्पष्ट करावा, त्यासाठी त्यांच्याकडे मराठीची शिकवणी लावायला तयार असल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर, झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाºयाला कसे जागे करणार, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला.
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
- साम-दाम-दंड-भेदाचा वापर करू, असे वक्तव्य करणाºया मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला? त्याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या आॅडिओ क्लिप संदर्भात काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.