कारवाईचा वेग मंदावलेला
By Admin | Published: June 9, 2017 02:13 AM2017-06-09T02:13:26+5:302017-06-09T02:13:26+5:30
मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले अथवा बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असल्याचा दावा महापालिका अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र दररोज सरासरी एकाच बेकायदा बांधकामावर महापालिका कारवाई करीत असल्याचे आकडेवारीवरून उजेडात आले आहे.
रस्त्यावर ठाण मांडणारे फेरीवाले, मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली. गेले वर्षभर या मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू आहे. वर्षभरात सुमारे ११ हजार बेकायदा बांधकामांवर २४ विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला
आहे.
मात्र या कारवाईसाठी प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटत असले तरी प्रत्यक्षात हा मोठा आकडा केवळ धूळफेक असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ४१३ बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. म्हणजेच दररोज सरासरी २९ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. याचाच अर्थ प्रत्येक वॉर्डात दररोज जेमतेम एकच कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्षात ५ हजार
झोपड्यांवर कारवाई
गेल्या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक, तर पाच हजार २८८ झोपड्या तथा कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांवर कारवाई केली आहे. एका वर्षात पाच हजार झोपड्यांवरच कारवाई करणे महापालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले आहे.
>१३ हजार बांधकामे तोडल्याचा दावा
मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बांधकामांवर वर्षभरात १३ हजार ४१३ बांधकामे तोडल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वर्षभरातील ही कारवाई असून त्यात सर्वाधिक बांधकामे एफ उत्तर व एम पश्चिम विभागातील आहेत.
अनधिकृत व्यवसायांवर हातोडा
एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक तर पाच हजार २८८ झोपड्या आणि कच्च्या स्वरूपाची बांधकामे तोडली.
एफ उत्तर विभागात सर्वाधिक कारवाया
माटुंगा, शीव, चुनाभट्टी, वडाळा, अॅण्टॉप हिल यासारख्या एफ उत्तर विभागात सर्वाधिक एक हजार ८४०, त्याखालोखाल एम पश्चिम विभागातील चेंबूर, टिळकनगर आदी परिसरातील एक हजार १९० आणि आर उत्तर विभागात एक हजार ९५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.