वाशिमच्या लाचखोर पशुसंवर्धन अधिका-यावर कारवाई
By Admin | Published: January 20, 2016 02:15 AM2016-01-20T02:15:54+5:302016-01-20T02:15:54+5:30
बदली टाळण्यासाठी पाच हजाराची मागणी.
वाशिम : पशुधन पर्यवेक्षकाची प्रशासकीय बदली केली नाही, म्हणून त्याला पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेचा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे याच्याविरूद्ध मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. वाशिम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत १ जुलै २0१५ रोजी तीन प्रशासकीय बदल्या होणार होत्या; परंतु इतर पशुधन पर्यवेक्षकांनी विनंती अर्ज केल्याने त्यांच्या बदल्या आधी करण्यात आल्या. तक्रारदार पशुधन पर्यवेक्षकाने कोणताही अर्ज न केल्यामुळे बदली करण्यात आली नाही. त्यादरम्यान तक्रारदार हा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामध्ये कामानिमित्त गेला होता. त्यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कल्यापुरे याने त्याची बदली आपण होऊ दिली नसल्याचे सांगून, त्या मोबदल्यात त्याला पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. ८ सप्टेंबर २0१५ रोजी तक्रारदाराने यासंदर्भात कल्यापुरे याच्याविरोधात वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार दाखल केली. अधिकार्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित अधिकार्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक ए.जी. रूईकर यांनी कल्यापुरे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली.