स्कूल बसची तपासणी न केल्यास कारवाई
By admin | Published: May 18, 2016 01:49 AM2016-05-18T01:49:08+5:302016-05-18T01:49:08+5:30
शाळकरी मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे.
चिंचवड : शाळकरी मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहर व परिसरातील स्कूल बसची तपासणी करण्याचे काम १ मेपासून सुरू झाले असून, १ जूनच्या आत संस्थाचालकांना या वाहनांची तपासणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
स्कूल बसची तपासणी नि:शुल्क करण्यात येत असून, आरटीओजवळच वाहनांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत वाहनाची गती मर्यादा, आपत्कालीन खिडकीची व्यवस्था, आगप्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, बैठक व्यवस्था, दप्तर ठेवण्यासाठीचा रॅक, तसेच सुरक्षिततेसंदर्भात असलेल्या एकूण २५ बाबींची तपासणी करण्यात येत आहे. त्रुटी दुरुस्त केल्यानंतरच त्यांनाही तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करताना त्या वाहनावरील चालकाना सुरक्षिततेसंदर्भात अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनदेखील करण्यात येत आहे. दरम्यान, वाहनाची तपासणी करण्याची ३१ मे ही शेवटची तारीख आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शालेय संस्थाचालकांनी शालेय बसची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आरटीओतर्फे सध्या वाहनांच्या तपासणीचे काम सुरू असून, ३१ मेपर्यंत तपासणी सुरू राहणार आहे. त्यानंतर वाहनांची तपासणी न केलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन
अधिकारी, पिंपरी-चिंचवड