डोनेशनसाठी विद्यार्थ्यांचा वापर केल्यास कारवाई
By Admin | Published: December 18, 2015 01:16 AM2015-12-18T01:16:13+5:302015-12-18T01:16:13+5:30
बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांवर विविध प्रकारच्या देणगी गोळा करण्याची जबाबदारी सोपवितात. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकतात. भीतिपोटी विद्यार्थी देणगी गोळा करण्यासाठी
नागपूर : बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांवर विविध प्रकारच्या देणगी गोळा करण्याची जबाबदारी सोपवितात. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकतात. भीतिपोटी विद्यार्थी देणगी गोळा करण्यासाठी फिरतात. हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी विधानसभेत केली. याची दखल घेत, डोनेशन गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेवर बोलताना, आ. मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून लहान वयांच्या विद्यार्थ्यांनादेखील स्कूल अॅक्टिविटीच्या नावाखाली डोनेशन गोळा करण्यास भाग पाडले जाते. ही एक सामान्य प्रक्रिया बनली आहे. अतिरिक्त रक्कम गोळा करण्यासाठी शाळांचा हा गोरखधंदा सुरू आहे. यावर अंकुश लावण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन सपकाळ, हसन मुश्रिफ, संजय केळकर, राहुल कूल, अबू आझमी आदींनीही या विषयावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी लोढा यांनी कोचिंग क्लासेसवरदेखील बंदी घालण्याची मागणी केली. राज्यात कोचिंग क्लासच्या रूपात शिक्षण माफियाचे काम जोरात सुरू आहे. ट्युशन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळले जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)